कोल्हापूर (प्रतिनिधी): कोगे (ता. करवीर) येथील भोगावती नदीत मोटार कार कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली. याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी नदीकडे एकच धाव घेतली. या घटनेची माहिती करवीर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुंडोपंत सूर्यवंशी हे मोटारीतून कुडित्रे येथील कुंभी कासारी साखर कारखान्याकडे जात होते. त्यांची मोटार कोगे (ता. करवीर) येथील भोगावती नदी आली असताना अचानक वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट नदीत कोसळली. त्यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर ही मोटर कार पाण्यातून बाहेर काढली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला असून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. ते करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांचे वडील होत.