नवी दिल्ली : देव भावनांचा भुकेला असतो असे म्हणतात. मग भक्त कुणीही असो. देवाकडे कोणताही भेदभाव नसतो. म्हणूनच काही ठिकाणी मानवेतर प्राणीही देवाचरणी लीन होऊन आपली भावना व्यक्त करताना दिसतात. ऐकायला विचित्र वाटलं तरी हे सत्य आहे की, माता चंडी मंदिरात मातेच्या आरतीला उपस्थित राहण्यासाठी माणसांसह चक्क काही अस्वल उपस्थित राहतात.
विशेष म्हणजेच गेल्या काही वर्षांपासून हे अस्वल नित्यानेमाने मंदिरात हजर राहतात. छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यांतर्गत घुंचपाली, बागबहरा येथे असलेल्या माता चंडी देवीच्या मंदिरात येणारे अस्वल हे लोकांच्या चर्चेचा विषय बनले आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी सहापेक्षा अधिक अस्वल मंदिरात येत असत. हे अस्वल आरती सुरू असताना येतात आणि आरती संपली की निघून जातात. त्यांनी आतापर्यंत कोणाचेही नुकसान केले नाही, परंतु धार्मिक श्रद्धा वाढवण्याचे काम नक्कीच केले आहे, असे मंदिरात येणारे भाविक म्हणतात. गेल्या वर्षी करोना संसर्गामुळे आई चंडीचा दरबार निर्जन होता. या काळात मातेच्या आरती दरम्यान एक अस्वल कुटुंब दररोज मंदिरात पोहोचत असे. आरतीला हजेरी लावल्यानंतर ते पुन्हा जंगलात जायचे.
* पाच वर्षात चार अस्वल मरण पावले
सहा अस्वलांचे हे कुटुंब दररोज मंदिर परिसरात जात असे. पण अचानक 2015 मध्ये दोन अस्वलांचा करंट लागल्याने मृत्यू झाला. तर 2019 मध्ये एक नर अस्वल जो 13 वर्षांपासून दररोज चंडी मंदिरात येतं असे, त्याचा मृतदेह मंदिर परिसरापासून 300 मीटर दूर शेतात आढळला, याशिवाय एप्रिल 2021 मध्ये अस्वलाच्या पिल्लाचा मृतदेह मंदिर परिसरापासून 600 मीटर दूर अंतरावर सापडला.
* प्राण्यांच्या बळीवर बंदी
माता चंडी मंदिरात प्राण्यांच्या बळीवर पूर्णपणे बंदी आहे. फळे, फुले, साडी, शृंगारासह नारळ अर्पण करूनच माता चंडीची पूजा केली जाते. जो कोणी इथे नवस घेऊन येतो, माता ती पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.