बंगळुरू – कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातील हसनांबा मंदिरात देवदर्शनाच्या रांगेत उभे असलेल्या भाविकांना विजेचा शॉक लागला. ही दुर्घटना शुक्रवारी घडली. यात 17 हून अधिक जणांना इजा झाल्याचे वृत्त आहे. या प्रकारानंतर भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.
2 ते 14 नोव्हेंबर दरम्यान वार्षिक हसनांबा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरातून हजारो भाविक दररोज दर्शनासाठी मंदिरात येतात. शुक्रवारी सकाळपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी होती. देवीच्या दर्शनासाठी भाविक रांगेत उभे होते. दरम्यान, विद्युत तार तुटून मंदिराच्या खांबाला स्पर्श झाल्याने खांबाजवळ रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना विजेचा शॉक लागला. या घटनेमुळे मंदिर परिसरात भाविक सैरावैरा धावू लागले. यामध्ये चेंगराचेंगरी होऊन काहीजण जखमी झाले.
यानंतर मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत गुंतलेल्या पोलीस पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणखी आणि जखमींना गर्दीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात नेले. सुमारे 17 भाविक जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच हसन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहम्मद सुजीत यांनी घटनास्थळाची पाहणी केली.