नवी दिल्ली – बऱ्याच प्रतीक्षेनंतर भाजपने अखेर कर्नाटकसाठी प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती केली. ती जबाबदारी 47 वर्षीय आमदार विजयेंद्र येडियुरप्पा यांच्यावर सोपवण्यात आली. त्या नियुक्तीमुळे भाजपने माजी मुख्यमंत्री आणि लिंगायत नेते बी.एस.येडियुरप्पा यांचा कर्नाटकमधील करिष्मा मान्य केल्याचे मानले जात आहे. पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र हे येडियुरप्पा यांचे पुत्र आहेत.
याआधी कर्नाटकमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळणाऱ्या नलिनकुमार कतील यांचा कार्यकाळ समाप्त झाला होता. त्याशिवाय, काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला त्या राज्यात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भाजपकडून नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती अपेक्षित होती. मात्र, ती नियुक्ती लांबली. त्यामुळे कर्नाटक भाजपमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता चव्हाट्यावरही आली. आता लोकसभा निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपने नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती केली आहे.
त्या पदावर विजयेंद्र यांची झालेली नियुक्ती चकित करणारी ठरली आहे. भाजपकडून विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी नेहमी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र, येडियुरप्पा पुत्राची नियुक्ती करताना भाजपने तो मुद्दा दुर्लक्षित केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, येडियुरप्पा यांचे थोरले पुत्र बी.वाय.राघवेंद्र हे पक्षाचे खासदार आहेत. येडियुरप्पा यांच्या इतका प्रभावी नेता भाजपकडे नसल्याच्या बाबीवर प्रदेशाध्यक्ष नियुक्तीने शिक्कामोर्तब केले आहे.
विजयेंद्र यांच्याकडे येडियुरप्पा यांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले जाते. भाजपकडून लिंगायत नेत्यालाच प्रदेशाध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. तो अंदाज खरा ठरला. पण, विजयेंद्र यांच्या रूपाने पहिल्यांदाच आमदार बनलेल्या नेत्यावर त्या पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. संघटनकौशल्य असणारे तरूण नेते ही ओळख त्यांना उपयोगी ठरल्याचे मानले जाते.