अकोले -कळसूबाई शिखरावर करोनामुळे यावर्षी भाविकांना येण्यास मनाई आहे. मात्र तरीही काही आदिवासी बांधव आपली दरवर्षीची दर्शनाची परंपरा मोडू नये, म्हणून कळसूबाई देवीच्या दर्शनाला जंगल रस्त्याने शिखरावर जाता आहेत.
राज्यातील एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या कळसूबाई शिखरावर जाण्याचा कुणालाही मोह आवरत नाही. त्यात नवरात्र म्हणजे अकोले तालुक्यासह राज्यभरातून देवीचे भक्त आणि पर्यटक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात. यावर्षी मात्र शिखरावर जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तरीही अनेक भाविक इतर मार्गाने शिखरावर जावून कळसूबाईचे दर्शन घेत आहेत. दरवर्षी नित्यनियमाने आदिवासी बांधव आपल्या आराध्य दैवत असलेल्या कळसूबाईचे दर्शन घेण्यासाठी हा अवघड डोंगर सर करत असतात.लहानग्यांपासून वयोवृद्धही डोंगर कपारीची ही अवघड वाट चढतात.
यावर्षी मात्र हजारो भाविक नवरात्रीत कळसूबाईच्या दर्शनासाठी येवू शकले नाहीत. जवळपास चार हजार फूट उंच असलेला कळसूबाईचा डोंगर परिसर हा अतिशय मनोहारी असा आहे. प्रचंड पाऊस कोसळल्याने आता हा परिसर हिरवाईने नटला आहे. सगळीकडे दाट धुके आणि जंगलातून सफर करत राज्यातील सर्वांत उंच डोंगर सर करण्याचा आनंद काही औरच आहे. पण पर्यटक मात्र या आनंदाला मुकले आहेत.करोनाचे जगभर संकट कोसळले आहे. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. मात्र देवाची मंदिरे आणि पर्यटनस्थळे अजूनही बंद आहेत. अकोले तालुक्याचे सर्व अर्थकारण पर्यटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे लवकर करोना संपू दे आणि मंदिरे, पर्यटनस्थळे सुरू व्हावीत, अशीच प्रार्थना सर्वजण देवीकडे करत आहेत.