पुणे – दसऱ्याच्या मुहूर्तावर महापालिका आयुक्तांनी जिम चालकांना आणि हॉटेल चालकांना दिलासा दिला आहे. रविवारपासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील जिम सुरू करण्याला परवानगी दिल्याने खुलजा जिम जिम.., असे म्हणत चालकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, आता हॉटेल्सची वेळही वाढवण्यात आली असून 9:00 ऐवजी रात्री 11:30 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवता येणार आहेत. मात्र, यासाठी पूर्वी घातलेल्या अटी कायम राहणार आहेत.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंदर्भातील आदेश शनिवारी जारी केले. शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेले जीम, व्यायामशाळा सुरू करता येणार आहे. मात्र हे सुरू करताना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार सुरू ठेवता येणार आहेत. त्यामध्ये सुरक्षाविषयीचे सगळे नियम यामध्ये सॅनिटायझेशन, मास्क, दोन व्यक्तीत सहा फुटांचे अंतर या सगळ्या नियमांचे पालन करावेच लागणार आहे. याशिवाय हॉटेल, फुडकोर्ट, रेस्टॉरंट चालकांनाही 50 टक्के क्षमतेचे नियम कायम असून, रात्री नऊ वाजेपर्यंतची वेळ वाढवून ती साडेअकरा करण्यात आली आहे. अद्याप उद्याने, शिक्षणसंस्था, नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांना परवानगी देण्यात आली नाही.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई…
जिम, व्यायामशाळा, हॉटेल्स, रेस्टॉरंट, फुडकोर्ट या सगळ्यांना सुरू करण्याला परवानगी दिली असली तर आरोग्य विभागाचे सगळे नियम पाळणे त्यांना बंधनकारकच आहे. या नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सध्या हॉटेल्स चालकांवर कारवाई करण्याला महापालिकेने सुरूवात केली आहे. हाच नियम जिम, व्यायामशाळांबाबतही आहे. त्यामुळे सॅनिटायझेशन, फिजीकल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांचे पालन करावे लागणार आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.