पुणे – कोकणातील हापूस म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. मार्केट यार्डातील फळ विभागात हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. एक पेटी फळविभागात दाखल झाली. पाच डझनाच्या या पेटीला तब्बल 18 हजार रुपये भाव मिळाला.
देवगड हापूस आंब्याचा नियमित हंगाम हा फेब्रुवारीअखेरीस सुरू होतो. त्यापूर्वी बाजारात हंगामपूर्व हापूस आंब्याची तुरळक आवक होत असते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुमकेश्वर कातवण गावातील शेतकरी रामभाऊ सावंत यांच्या बागेतून मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बापू भोसले यांच्या मे. नामदेव रामचंद्र भोसले ऍन्ड सन्स या फर्मवर हापूस आंब्याची आवक झाली. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या हस्ते आंब्याच्या पेटीचे पूजन झाले.
यावेळी फळ विभागाचे प्रमुख बाबासाहेब बिबवे, तरकारी विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर, आडते असोसिएशनचे अध्यक्ष बाप्पू भोसले, रामदास गायकवाड, अनिकेत भोसले, करण जाधव, राजेंद्र सूर्यवंशी, संजय वखारे, विलास थोपटे, नितिन जामगे आदी
उपस्थित होते.
यावेळी बापू भोसले म्हणाले, करोनामुळे मागील दोन वर्ष कोकणातील आंबा उत्पादकांचे नुकसान झाले. यंदा भरघोस उत्पादनामुळे यंदा आंब्याचा हंगाम चांगला होणार असून शेतकयांना फायदा होईल.’
चांगल्या हवामानामुळे दोन वर्षांच्या तुलनेत आंब्याचे उत्पादन चांगले आहे. फळधारणा चांगली असल्याने यंदा भरपूर आंबा उपलब्ध होणार आहे. फेब्रुवारीअखेरीस आंब्याचा हंगाम नियमित सुरू होईल.
– चेतन सावंत, आंबा उत्पादक शेतकरी