मुंबई : चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी काल पाहणी केली. यावेळी मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच दमदाटी केल्यामुळे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता भास्कर जाधव यांच्या या कृतीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
पूरग्रस्त महिलेला दमदाटी करतानाच भास्कर जाधव यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. याच वर्तनाविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पुरग्रस्तांविषयी चिंता,संवेदनशीलता सर्वानीच दाखवली पाहिजे. मात्र भास्कर जाधवांनी केलेलं वर्तन हे अतिशय धक्कादायक असल्याचे फडणवीस म्हणाले आहे.
महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण शहराचा दौरा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांना धीर देताना पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची सर्वकष योजना जाहीर केली जाईल असंही सांगितलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामधील एका घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि खास करुन शिवसेनेला चांगलच धारेवर धरलं आहे.