उभ्या ऊस पिकांसह शेतीच गेली वाहून…, तिळगंगा नदीने पात्र बदलल्याने फटका…

वाळवा तालुक्यातील रेठरे धरण- ओझर्डे हद्दीवरील प्रकार

इस्लामपूर – रेठरे धरण- ओझर्डे हद्दीवर असणाऱ्या तिळगंगा नदीने पात्र बदलल्याने अनेक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. ओझर्डे ( ता.वाळवा.जि.सांगली) येथील जगदीश शामराव पाटील या शेतकऱ्याची तब्बल ३० गुंठे शेतीच उभ्या ऊस पिकांसह वाहून गेली आहे. या नदीकिनारी असणारा दगडी संरक्षक बांध प्रवाहात वाहून गेल्याने मोठी हानी झाली आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/669603297350442

इस्लामपूर शहराच्या पश्चिमेला पेठ,सुरुल,ओझर्डे,रेठरे धरण,गोळेवाडी,नायकलवाडी परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी आले होते. तीळगंगेचे पात्र छोटे असले तरी ते ओढ्या पेक्षा नदी म्हणूनच ओळखले जाते. मागील आठवड्यात परिसरात झालेल्या प्रचंड पावसाने या नदीला पाणी आले. ते पाणी पात्राबाहेर आले. पाण्याच्या प्रचंड दाबाने अनेकांच्या शेतीतील मोठे-मोठे दगडी बांध प्रवाहात वाहून गेले.या नदीकाठी असणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांना आतां पंचनाम्याची प्रतीक्षा आहे.

एकीकडे कृष्णा व वारणा नदीच्या महापुराने वाळवा तालुक्यातील नदीकाठी नदीकाठी असणाऱ्या २९ गावांना फटका बसला आहे. पण दुर्लक्षित असणाऱ्या छोट्या छोट्या ओढ्या-नदीला पूर आल्याने प्रथमच अनपेक्षितपणे हा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या शंभर वर्षांत कधीही एवढा पाऊस पडला नसल्याचे येथील जेष्ठ नागरिक सांगत होते.

वाळवा तालुक्यातील ओझर्डे गावातील जगदीश शामराव पाटील हे अल्पभूधारक शेतकरी. शेती हाच त्याचा व्यवसाय आहे. अवघी ३० गुंठे क्षेत्र असताना तेच संपूर्ण क्षेत्र वाहून गेले. तेही उभ्या ऊस पिकासह .सात ते आठ महिन्यापूर्वी त्यांनी( 86-0-32 )या जातीच्या ऊसाची लागण केली होती.

मेहनत करण्यासाठी ७० हजार रुपये खर्च केला होता. शेत जमिनीच्या कडेने तिळगंगा नदीचे पात्र असल्याने अनेक शेतकऱ्यांनी दगडी ताली म्हणजेचबांध घातले आहेत होते. त्यांच्या शेतीपासून अगदी जवळ नदीवर छोटा सिमेंट बांध आहे. त्याच्या बाजूने मार्ग काढत पाण्याचा प्रवाहाने बाजूच्या शेतातील उभ्या पिकात पाणी घुसून नदीने पात्र बदलेले आहे.

जगदीश पाटील यांनी ही दोन वर्षांपूर्वी सोसायटीचे कर्ज काढून शेत जमिनीला संरक्षक भिंत घातली होती. त्याला तब्बल तीन लाख रुपये असा खर्च आला होता. वीस फूट उंची असणारी आणि चारशे फूट लांब असणारी संरक्षक भिंत पाण्याच्या प्रचंड दाबाने फुटून ३० गुंठे जमीनचं होत्याची नव्हती झाल्याने त्यांचे कुटुंबीय हतबल झाले आहेत.

कोरडवाहू शेती असल्याने ठिबक योजनेच्या माध्यमातून पाणी दिले जात होते. हे सर्व ठिबकचे पाइपलाइन संचही वाहून गेले आहेत. पाणी वाहून गेल्याच्या खुणा जमिनीवर दिसत आहेत. काही उभा ऊस आडवा झाला आहे.
जगदीश पाटील यांना मुलं दोन आहेत. मुलगी विवाहित आहे.पती-पत्नी, आई-मुलगा असे चौकोनी कुटुंब याच ३० गुंठे शेतीवर उदरनिर्वाह करीत होते. एक म्हैस आहे. तीला अन् कुटुंबाला जगवण्यासाठी आतां रोजंदारी शिवाय पर्याय नाही. कोरोनामुळे हाताला काम मिळत नाही पुढे करायचे काय ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.