Devendra Fadnavis – राज्यातील पॉन्झी योजनांच्या वाढत्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक अभ्यासगट तयार करेल आणि गुंतवणूकदारांची फसवणूक रोेखण्यासाठी ज्या शिफारशी केल्या जातील त्याची अंमलबजावणी केली जाईल असे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी विधीमंडळात सांगितले.
राज्य सरकार तीन महिन्यांसाठी या विषयावर अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करणार आहे. एकदा गटाने आपल्या शिफारशी सादर केल्यानंतर, विद्यमान कायद्यांमध्ये आवश्यक बदल केले जातील. लोकांचे पैसे लुटण्याच्या घटना कमी करण्यासाठी आम्ही नियम अधिक कडक करण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले.
यापूर्वी रवींद्र वायकर, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह काही आमदारांनी राज्यातील पॉन्झी योजनांवर प्रश्न उपस्थित केले होते. गुंतवणुकीवर जास्त परतावा देणार्या एजन्सींनी संबंधित नियामकांकडून योग्य परवानग्या घेतल्या पाहिजेत, यासाठी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला सरकार सूचना देईल, असे आश्वासन फडणवीस यांनी सभागृहाला दिले.
अशा फसव्या योजनांबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी राज्यचा गृह विभागही विशेष प्रयत्न करणार आहे. हे लोक रडारखाली राहून आपल्या ग्राहकांना लक्ष्य करतात. काही वेळा तर डार्कनेटचा वापरही होताना दिसतो, असेही ते म्हणाले.