नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी बोलताना येत्या मार्चमध्ये राज्यात भाजपचे सरकार असेल असे भाकीत वर्तवले. राणे यांच्या या राजकीय भविष्यवाणीमुळे चर्चांना उधाण आले असून अनेक नेतेमंडळींनी देखील राणेंच्या भाकितावर भाष्य केले आहे. महाविकास आघाडीतील नेते अनिल परब, नाना पटोले, नवाब मलिक यांनी राणेंच्या सरकार कोसळण्याबाबतच्या भविष्यवाणीवरून त्यांना चांगलेच टोले लगावले आहेत.
अशातच आता राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस हे सध्या दिल्ली येथे असून तेथे पत्रकारांनी त्यांनी नारायण राणे यांनी केलेल्या भविष्यवाणीबाबत विचारले असता त्यांनी हसत मुद्रेने ‘आपण हे ऐकलेलं नाही’ एवढंच उत्तर दिलं.
यावेळी पत्रकारांनी फडणवीस यांना ते व चंद्रकांत पाटील दिल्ली येथे दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उद्धण आले आहे असे सांगितले असता त्यांनी, “कुठल्या राजकीय चर्चेला उधाण आलंय याची मला कल्पना नाही. मी आणि चंद्रकांत पाटील भाजपाच्या संघटनात्मक बैठकीला इथे आलोय. आमचे संघटनमंत्री बीएल संतोष, शिवप्रकाश, सीटी रवी, मी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशी आमची आज एकूणच संघटनेतील वाटचाल आणि त्याचा आढावा अशी बैठक होती. आम्ही चार-पाच तास त्याच बैठकीत होतो. त्यामुळे मला वाटत नाही की त्यापेक्षा वेगळा काही आमचा अजेंडा होता.”
संघटनात्मक बदलाच्या चर्चाही नाकारल्या
फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना, “अमित शाह आमचे नेते आहेत. आम्ही दिल्लीला आलो आणि अमित शाह हे असतील तर आम्ही त्यांची भेट घेतोच. त्यामुळे कुठलाही संघटनात्मक बदल नाही.” असं देखील सांगितलं.
दरम्यान, महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ६ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या असून नागपूर, अकोला-वाशीम-बुलडाणा या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. नागपुरात काँग्रेस विरुद्ध भाजप तर अकोला-वाशीम-बुलडाणा येथे भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांचे तिकीट नाकारण्यात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने नागपुरातून विधानपरिषदेची संधी दिली आहे. येथे त्यांची लढत काँग्रेस उमेदवार छोटू भयोर यांच्याशी असेल.
नागपुरातील विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत भाष्य करताना फडणवीस यांनी, “काँग्रेसला अशी अपेक्षा आहे की नागपूरमध्ये ते काही चमत्कार घडवू शकतील. परंतु कुठलाही चमत्कार घडणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे हे चांगल्या फरकाने नागपुरमध्ये निवडून येतील.” असे स्पष्ट केले.