नगर – पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथे शेतामध्ये इलेक्ट्रीक पोल लावण्याच्या कारणावरून माजी सैनिकासह त्यांच्या मुलावर कुऱ्हाड, लाकडी काठी व गजाने हल्ला करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांना जखमी केल्याची घटना बुधवारी (दि.8) रोजी घडली होती. त्यातील तिघा आरोपींना पाथर्डी पोलिसांनी अटक करून, न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची कोठडी दिली आहे.
माजी सैनिक भाऊसाहेब दगडू आढाव (वय 65) व त्यांचा मुलगा हर्षल भाऊसाहेब आढाव (दोघे रा. जेऊर बायजाबाई ता. नगर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर नगर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी अर्जून लहानु गोरे, भाऊसाहेब अर्जून गोरे, बबन दारकुंडे यांना पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच यातील बाबासाहेब गंगाधर बेल्हेकर, बाबासाहेब अर्जुन गोरे (दोघे रा. शिराळ चिचोंडी) हे पसार झाले आहेत.
बुधवार (दि. 8) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शिराळ (ता. पाथर्डी) शिवारातील आढाव यांच्या शेत जमिनीमध्ये ही घटना घडली. जखमी भाऊसाहेब आढाव यांनी उपचारादरम्यान पाथर्डी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अर्जुन लहानु गोरे, बाबासाहेब गंगाधर बेल्हेकर, बाबासाहेब अर्जुन गोरे, भाऊसाहेब अर्जुन गोरे, बबन श्रीपदी दारकुंडे (सर्व रा. शिराळ) यांच्याविरूध्द भादंवि कलम 326, 325, 324, 323, 427, 143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभिर्यपहाता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधीकारी अजित पाटील व पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी 307 कलम वाढ करण्यात आली आहे.
भाऊसाहेब आढाव यांची शिराळ शिवारात शेत जमिन असून त्यामध्ये अर्जुन गोरे याने भाऊसाहेब यांना न विचारता विहिरीचे खोदकाम केले आहे. यासंदर्भात भाऊसाहेब यांनी पाथर्डी न्यायालयात दावा दाखल केला आहे. दरम्यान भाऊसाहेब हे शनिवार, 4 मार्च रोजी शेतामध्ये गेले असता त्यांना शेतामध्ये इलेक्ट्रीक पोल लावलेले दिसले. त्यांनी यासंदर्भात मिरी इलेक्ट्रिक सबस्टेशनकडे तक्रार दिली होती. भाऊसाहेब व त्यांचा मुलगा हर्षल बुधवार, 8 मार्च रोजी सकाळी शेतामध्ये गेले असता इलेक्ट्रीक पोलजवळ अर्जुन गोरे, बाबासाहेब बेल्हेकर, बाबासाहेब गोरे, भाऊसाहेब गोरे, बबन दारकुंडे होते. अर्जुन गोरे याने माजी सैनिक भाऊसाहेब आढाव यांच्यावर कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला असता त्यांनी तो चुकवला असता त्याच्या बोटाला लागून ते तुटले आहे. त्यात फिर्यादीचे दोन्ही हात फॅक्चर झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंडे हे करत आहेत.