अजित पवार यांनी सहकाऱ्यांनाच खडे बोल सुनावले
बारामती/ जळोची : राज्यस्तरीय जलतरण तलावाचे बजेट सात कोटी रुपयांपेक्षा अधिक होते. मात्र, यामध्ये काटकसर करून हा केवळ पाच कोटी रुपयांत उभारला आहे. तरीही गुणवत्तेत तडजोड केली नाही. त्यासाठी खास टीम काम करीत आहे. तिकडे इंदापूरला काटकसर कोण करणार? लक्ष कोण ठेवणार? कोण बघणार, अशी दर्जेदार विकासकामे उंटावरून शेळ्या राखून होत नाही, असे खडे बोल अजित पवार यांनी स्वपक्षीयांतील पदाधिकाऱ्यांना सुनावले. पवार यांच्या वक्तव्याची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.
बारामतीमधील शारदानगर येथे बांधलेल्या राज्यस्तरीय जलतरण तलावाची पाहणी केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी असाच जलतरण तलाव इंदापूर येथे बांधण्यासाठी मी आणि दत्तात्रय भरणे यांनी ठरविल्याचे जाहीर केले. याच भाषणाचा धागा पकडून पवार यांनी कानपिचक्या दिल्या.
पवार म्हणाले, राष्ट्रवादीमुळे अनेक संस्थांचे चेअरमन पद मिळाले आहे. कोणत्याही संस्थेची विकासकामे कमी बजेटमध्ये होणे अपेक्षित आहे. राज्यस्तरीय जलतरण तलावाचे बजेट सात कोटींपेक्षा अधिक होते. मात्र, यामध्ये काटकसर करून हा केवळ पाच कोटींत उभारला आहे. तरीही गुणवत्तेत तडजोड नाही. मतदारसंघातील विकासासाठी सर्व आव्हाने स्वीकारण्यास तयार आहेत म्हणून तिकडे अशीच टीम तयार करू, बारामतीप्रमाणे तेथेही सुविधा देऊ.
…घरचे आमच्याशी असं वागतात
लहानपणी आम्हा सर्व भावंडांना पोहण्यासाठी सक्तीच केली जात होती. पोहता येत नसले तरी डबा बांधून विहिरीत ढकलले जात होते. त्यावेळी आमच्या वडिलधाऱ्यांना त्याचं काही वाटत नव्हतं, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली. जलतरण तलावाच्या उद्घाटनप्रसंगी पोहण्याचा धागा गुंफत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शरद पवार, खासदार सुप्रिा सुळे यांनी त्यांच्या बालपणातील पोहण्याचे किस्से सांगितले. संपूर्ण सभागृह हास्य फवाऱ्यात चिंब झाले होते.