पुणे, दि. 21 -आर्थिकदृष्ट्या प्रगत 20 देशांची “जी 20 परिषद’ 2023 मध्ये पुण्यात होणार आहे. त्यासाठी शहर चकाचक करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली असून, जानेवारी 2023 पर्यंत शहरातील 60 चौकांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने हे चौक “सीएसआर’अंतर्गत विकसित केले जाणार असून, त्यासाठी पालिकेने प्रस्ताव मागविले आहेत. आतापर्यंत 25 चौकांसाठी प्रस्ताव आले आहेत. मात्र, त्याच वेळी शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असताना रस्त्यांच्या दुरुस्तीऐवजी आता प्राधान्यक्रमाने चौकांचे सुशोभीकरण होणार असल्याचे चित्र आहे.
या परिषदेसाठी पुणे विद्यापीठ, आयशर आणि खराडी येथे बैठका होण्याची शक्यता असल्याने 20 देशांचे मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही परिषद भारतात होत असताना 213 बैठका होणार आहेत. त्यापैकी 13 बैठका या महाराष्ट्रात होणार आहेत. यासाठी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या शहरांची निवड करण्यात आली आहे. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी काही आठवड्यांपूर्वी एक बैठक शहराचे सौंदर्यीकरण व स्वच्छतेसंदर्भात आदेश दिले आहेत. या परिषदेसाठी पुण्यात 20 देशांचे 200 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हे प्रतिनिधी शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व इतर पर्यटनस्थळांना भेटी देण्याचीही शक्यता आहे.
60 चौकांमध्ये होणार काम
दरम्यान, या परिषदेसाठी तातडीची बाब म्हणून शहरातील 60 चौकांचे सुशोभीकरण केले जाणार असून, त्यासाठी शहरातील सर्व भागातील प्रमुख चौकांची निवड करण्यात आली आहे. नगर रस्ता, येरवडा, विमाननगर, खराडी, विश्रांतवाडी, मुंढवा, हडपसर, वानवडी, फुरसुंगी, कोंढवा, खडी मशिन, स्वारगेट परिसर, कात्रज, नवले पूल, वडगाव चौक, पौड रस्ता, कर्वे रस्ता, बाणेर, सातारा रस्ता, वारजे, धायरी, महंमदवाडी या भागांतील 60 चौकांची यादी तयार केली आहे. तर 25 संस्थांनी हे चौक सुशोभीकरणाची तयारी दर्शविली आहे.