घरी बसून मिळणार सर्व योजनांची माहिती
पुणे – शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने शेतीची कामे सोपी करण्यासाठी एक मोबाइल ऍप लॉन्च केले आहे. या ऍपचे नाव “कृषी किसान ऍप’ असून, शेतीविषयक सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांना घरी बसून मिळणार आहे. त्यामुळे हे ऍप शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.
“कृषी किसान ऍप’मध्ये सरकारकडील जिओ-टॅग युक्त पीक डेमो शेती आणि बीज केंद्र आदींची माहिती असणार आहे. कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या मते, बियांचे मिनी किट बिजांची संख्या वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना वाटण्यात येत आहे. मिनी किट आता जिओ- टॅग युक्त आहेत. यामुळे सरकारला मिनी किटचा उपयोग होत आहे का नाही याची माहिती मिळणार आहे. त्यावरून भविष्यात शेतीच्या उत्पन्नाचा अंदाज लावता येणे शक्य होणार आहे.
या ऍपमुळे शेतकऱ्यांना आपल्या क्षेत्रातील वैज्ञानिक शेतीच्या प्रात्यक्षिकांची माहिती मिळणार आहे. परिसरात कुठे वैज्ञानिक पद्धतीने शेती केली जाते, याची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासह इतर राज्यांतील कोणत्या हंगामात कोणत्या पिकांचे प्रात्यक्षिक घेतले जात आहे, याचीदेखील माहिती मिळणार आहे. यशस्वी शेतीचा डेमो पाहून शेतकऱ्यांना त्याप्रकारची शेती करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. या ऍपमधून देशभरातील बियांची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना देशातील 150 सीड हबची माहिती उपलब्ध होणार आहे. डाळींच्या उत्तम दर्जाचे बीज देऊन शेतीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहेत.
मिनी किट डिस्ट्रब्यूशनच्या माध्यमातून सरकार कमी पैशात चांगल्या प्रतीच्या बिया आणि खाद्य उपलब्ध करून देते, याची माहिती बहुतांशी शेतकऱ्यांना नाही. आपल्या जिल्ह्यात या सुविधा कधी आणि केव्हा मिळतील याची माहिती शेतकऱ्यांना या ऍपच्या मदतीने मिळणार आहे. याचा विशेषत: गरीब शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.