मुंबई – आयपीएल स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्याच रॉयल चॅलेंजर बेंगळुरुचा माजी कर्णधार विराट कोहली खातेही उघडू शकला नाही. त्याला दुष्मंत चमिराने पहिलायाच चेंडूवर बाद केले. आपण ज्या पद्धतीने बाद झालो ते कोहली लपवू शकला नाही व स्वतःवरच हसला. सातत्याने येत असलेल्या अपयशातून मार्ग कसा काढायचा हाच सध्या कोहलीसमोरचा मोठा प्रश्न आहे.
या सामन्यात पहिल्याच षटकात बेंगळुरूचा सलामीवीर अनुज रावत आणि कोहली सलग दोन चेंडूवर बाद झाले. कोहलीला एकही धाव घेता आली नाही. चमिराने उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर रावतला कर्णधार लोकेश राहुल करवी झेलबाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कोहलीला याच षटकातील सहाव्या चेंडूवर बाद केले.
खरेतर हा चंडू ऑफस्टम्पच्या खूप बाहेर पडला होता. मात्र, तरीही कोहलीला त्याची छेड काढण्याचा मोह आवरला नाही व त्याने बाहेर जात असलेल्या चेंडूला बॅट लावली व पहिल्या स्लीपमध्ये दीपक हुडाने त्याचा झेल घेतला. बाद जाल्यावर आपण चूक केल्याचे कोहलीच्या लक्षात आले मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हताश झालेला कोहली स्वतःच्याच चुकीवर निराशेने हसला व डगआऊटमध्ये परतला.
सध्या कोहलीचे अपयश सातत्याने चर्चिले जात असून गेल्या जवळपास अडीच वर्षांत त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. कोहली आयपीएलच्या इतिहासात केवळ 4 वेळा शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी तो 2008 साली मुंबई इंडियन्सविरुद्ध, 2014 साली पंजाब किंग्जविरुद्ध, 2017 साली कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध तर यंदा 2022 साली लखनौ विरुद्ध शून्यावर बाद झाला आहे. तो या स्पर्धेच्या इतिहासात तब्बल 5 वर्षानंतर पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला आहे.