बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनमध्ये गणली जाणारी प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये देखील तेवढीच लोकप्रिय आहे. बॉलिवूडमध्ये देसी गर्ल नावाने सर्वपरिचित असलेली प्रियंका तिच्या चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील चर्चेत असते. आपल्या आयुष्यात काय चाललंय याबाबत प्रियंका फॅन्सना सोशल मीडियातून माहिती करून देत असते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली होती. यानंतर प्रियंका सातत्याने चर्चेत आहे. अशातच आता प्रियांकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्याद्वारे तिने तिला मुंबईची आठवण येत असल्याचे सांगितले आहे.
त्याचं झालं असं की, प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्रामवर प्रोफाईलवर नुकताच नाश्ताच्या प्लेटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या प्लेटमध्ये भारतीय खाद्यपदार्थ असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देताना प्रियंकाने तिला मुंबईची आठवण येत असल्याचेही सांगितले आहे.
प्रियंकाने शेअर केलेल्या या फोटोत तिने नाश्त्यासाठी कांदेपोहे मागवल्याचे दिसत आहे. या पोह्यांनी भरलेल्या प्लेटचा फोटो शेअर करत ती म्हणते, “LA (लॉस एंजेलिस) मध्ये पोहे. या पोह्यांनी मला मुंबईची आठवण करुन दिली. धन्यवाद….”. कॅप्शनमध्ये प्रियंकाने हृदय आणि हात जोडलेला इमोजी शेअर केला असून यातून देसी गर्ल जरी परदेशी गेली असली तरी तिचं मन देशातच अडकलं असल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान प्रियंका चोप्राला भारतीय खाद्यपदार्थांची विशेष चाहती आहे. काही महिन्यांपूर्वी प्रियंकाने एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी तिने म्हटले होते की, न्यूयॉर्कमध्ये ‘सोना’ नावाचे तिचे स्वतःचे रेस्टॉरंट देखील आहे, जिथे ती अनेकदा भारतीय खाद्यपदार्थांवर येथेच्छ ताव मारते.