पुणे – मत्स्य व्यवसायाची पाहणी करायला गेले कासारसाई धरणाच्या पाण्यात मधोमध उपमुख्यमंत्री अजित पवार अडकल्याची घटना घडली आहे. तराफ्याचे इंजिन अचानक बंद पडल्यामुळे हा प्रकार घडला आहे.
तराफ्यावरचं वजन जास्त झाल्याने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला त्यामुळे काही वेळा साठी गोंधळ उडाला होता. मात्र लगेचच अजित पवार दुसऱ्या बोटीत बसले आणि पुढचा प्रवास सुरु झाला.
पुण्याच्या मावळ तालुक्यात कासारसाई धरण आहे. तिथे बऱ्यापैकी मत्स्यव्यवसाय सुरू आहे. त्याचीच माहिती घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सकाळी सात वाजताच पोहोचले होते.
धरणाच्या मध्यभागी पिंजरा लावण्यात आलेला होता. तिथे जाण्यासाठी तराफा अथवा बोटीच्या साह्याने जायचे होते. संबंधित मालकांनी पवार यांना तराफ्यावर घेऊन जायचे नियोजन आखले होते. गाडीतून अजित पवार उतरताच त्यांना याची कल्पना देण्यात आली.
गरजेपेक्षा जास्तीचे लोक त्यावर घेऊ नका, अशी सूचना त्यांनी केली होती. मात्र तरीही उपस्थितांनी तराफ्यावर गर्दी केली आणि तराफ्यावरचं वजन जास्त झाल्याने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला होता.
दरम्यान, घडलेल्या प्रकारावर मिश्किल टिप्पणी करत अजित पवार म्हणाले की, इथलं पर्यटन म्हणजे भलतीच कसरत आहे.