वडगाव मावळ – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शुक्रवारी (दि. 3) रोजी मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मावळ तालुक्यातील 180.57 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा आज लोकार्पण व उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी चंद्रकांत दाभाडे, संजय बाविस्कर, सुहास गरुड उपस्थित होते. तळेगाव दाभाडे नगर परिषदेची जीर्ण झालेली इमारत पाडून या ठिकाणी नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या कोनशिलेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्याच्या खनिकर्म उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री मदन बाफना, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
आमदार शेळके यांनी मागील तीन वर्षांत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून तळेगाव दाभाडे नगर परिषद या अंतर्गत सुमारे 64 कोटी 86 लाख रुपये किमतीच्या रस्त्यांचे तसेच मावळ तालुक्यातील कार्ला, शिरदे, वडिवळे, मंगरूळ आदी भागातील सुमारे 81 कोटी रुपये किमतीच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. वडेश्वर येथील आदिवासी शाळा बांधण्यासाठी 10.75 कोटी इतका निधी उपलब्ध झाला असून मावळ तालुक्यातील पांदण रस्त्यांसाठी सुमारे 13.20 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मावळ तालुक्यामध्ये दहा मंडल कार्यालये व 43 तलाठी कार्यालये यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या व अन्य सर्व कामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवत आमदार शेळके यांनी 2019 साली मोठ्या फरकाने विजयश्री खेचून आणली होती. यानंतर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मावळ तालुक्याचे चित्र आमदार शेळके यांनी बदलत मावळ तालुक्याचा विकास हेच राजकीय केंद्र असल्याचे त्यांनी दाखवून दिले. तळेगाव दाभाडे येथे नगर परिषद कार्यालयासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मान्यवर संबोधित करणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
नियोजित दौऱ्याची रुपरेषा
उपमुख्यमंत्री पवार हे प्रथम देहूरोड येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन करतील. त्यानंतर सोमाटणे फाटा येथे पवन मावळातील कार्यकर्त्यांची भेट घेणार. तळेगाव दाभाडे येथे आल्यानंतर अजित पवार मारुती मंदिर चौक ते कार्यक्रम स्थळ अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील. तळेगाव दाभाडे शहरामध्ये पवार यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर मंडप, मुख्य चौकांमध्ये कमान उभारण्यात आलेले असून अजित पवार, सुनील शेळके व मान्यवरांचे कटाउट लावण्यात आलेले आहेत. कार्यक्रमस्थळी भव्य मंडप उभारण्यात आला असून कार्यक्रमस्थळी येणाऱ्या गाड्यांसाठी सर्व दिशांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
====================