मुंबई :- “शिवराज्याभिषेक सोहळा आपण अनुभवत आहोत, हे आपले भाग्य आहे. महाराष्ट्र निर्मितीची सुरुवात स्वराज्य स्थापनेपासून झाली. राज्य कसे करावे, हे शिवरायांनी जगाला शिकविले. शिवराय न्यायप्रिय राजे म्हणून अजरामर आहेत. दिल्लीतही शिवरायांचा भव्य पुतळा उभारला पाहिजे, अशी मागणी राज्याच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात उपमुख्यमंत्री बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी केलेली कामे आजही आम्हाला आदर्शवत आहेत. त्यांच्या राज्याभिषेकाने नवी नाणी तयार करण्यात आली, गडकिल्ल्यांना नवे अस्तित्व मिळाले.
छत्रपतींची राजमुद्रा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर आणली आहे, आता छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक राजधानी नवी दिल्ली येथे झाले पाहिजे, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याच्या वतीने करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.