बायोबबल व विलगीकरणानेच नैराश्‍य – प्रणॉय

नवी दिल्ली – बायोबबल सुरक्षेत तसेच विलगीकरणात राहताना कठोर नियमांचे पालन करणे कठीण गेले असून यामुळेच थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान माझी मानसिकता निराशाजनक बनली आणि त्याचा विपरीत परिणाम कामगिरीवरही झाला, असे मत भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने व्यक्त केले आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व प्रकारच्या स्पर्धासाठी बायोबबल सुरक्षेत राहणे खेळाडूंना अनिवार्य असून त्यांना विलगीकरणाच्या नियमांचेही काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असते. मात्र, त्यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होत असून त्यांची कामगिरीही खालावत चालली आहे, असेही त्याने सांगितले.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर नव्या वर्षात प्रणॉय प्रथमच स्पर्धात्मक बॅडमिंटनकडे परतणार होता; परंतु थायलंड खुल्या स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वीच करोना चाचण्यांसंबंधी झालेल्या गोंधळामुळे प्रणॉयला स्पर्धेतील प्रवेश नाकारण्यात आला.

बॅंकॉकमध्ये दाखल होताच आम्हाला बायोबबल सुरक्षेत नेण्यात आले. आयुष्यात पहिल्यांदाच मी अशा एखाद्या गोष्टीचा सामना करत होतो. 14 दिवसांचा तो काळ फारच कठीण होता. दिवसाच्या 24 तासांपैकी दोनच तास सरावासाठी हॉटेलबाहेर पडण्याची मुभा होती. कालांतराने माझ्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे जाणवू लागले, असे प्रणॉयने सांगितले.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या गोंधळामुळे मी अस्वस्थ झालो. मी व सायना नेहवालने संपूर्ण दिवस रुग्णालयातच करोना चाचण्या देण्यात घालवला. त्यानंतर आम्हाला खेळण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी यामुळे माझ्या तयारीवर परिणाम झाला. बायोबबल सुरक्षा आता खेळाचा भागच झाल्याने विलगीकरणाच्या दिवसांमध्ये मानसशास्त्रज्ञाची भूमिका मोलाची ठरू शकते. मलाही त्या काळात कोणी तरी मार्गदर्शन करण्यासाठी तसेच संवाद साधण्यासाठी हवे होते. जेणेकरून मी मन स्थिर ठेवून खेळावर लक्ष केंद्रित करू शकलो असतो, असेही तो म्हणाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.