लंडन – मोबाइलचा वापर हा आधुनिक जीवनशैलीतील एक अविभाज्य भाग झाला असला तरी लहान मुलांच्या बाबतीत मात्र याबाबत नकारात्मक माहिती समोर येत आहे. एका आकडेवारीप्रमाणे वयाच्या 11 व्या वर्षापर्यंत बहुतांशी म्हणजे 91% मुलांकडे मोबाइल असतो आणि ते त्याचा नियमित वापर करत असतात; पण ही मुले जेव्हा 19 व्या वर्षापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यापैकी 65 टक्के मुले डिप्रेशनची म्हणजे नैराश्याची शिकार झालेली असतात.
ब्रिटनमधील ऑफकॉम नावाच्या संस्थेने याबाबत सर्वेक्षण केले असून त्याबाबतचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. या संशोधनाप्रमाणे ब्रिटनमधील 91% मुलांकडे वयाच्या 11 वर्षापर्यंत स्वतःचा असा मोबाइल असतो अमेरिकेतील आकडेवारी प्रमाणे नऊ ते अकरा या वयोगटातील 37 टक्के मुलांकडे मोबाइल असतो.
युरोपमधील 19 देशांमधील 13 व्या वर्षापर्यंतची 80 टक्के मुले दररोज इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना आढळली. केम्ब्रिज विद्यापीठाच्या प्रोफेसर एमी ऑर्बन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वयाच्या आठव्या वर्षापर्यंत अनेक मुलांनी आपलं सोशल मीडियावरील अकाउण्टही खुलं केलं आहे. स्मार्टफोनचा वापर आणि सोशल मीडियाचा वापर यामध्ये योग्य समन्वय साधणे महत्त्वाचे असल्याची सूचना डॉक्टर एमी यांनी दिली आहे.
या सर्वेक्षणामध्ये एकूण सतराशे मुलांवर आणि मुलींवर संशोधन करण्यात आले. त्यापैकी ज्या मुलांनी आणि मुलींनी वयाच्या अकरा वर्षांपर्यंत सोशल मीडियाचा वापर सुरू केला होता, त्यापैकी 65 मुले आणि मुली आयुष्यामध्ये नंतर समाधानी राहिले नव्हते. या कालावधीमध्ये सोशल मीडियाचा वापर न करणारे मुले आणि मुली मात्र समाधानी आयुष्य जगताना दिसले. मोबाइलच्या वापरामध्ये सोशल मीडियाचा वापर किती प्रमाणात आहे हे सर्वात महत्वाचे असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. पालकांनी आपल्या मुलांना मोबाइल देताना ते सोशल मीडियावर किती वेळ व्यतीत करतात यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही या अहवालात करण्यात आल्या आहेत.