नगर – पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या प्रकल्पांमधील जलसाठातील घट चिंता वाढविणार आहे. त्यात तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचला आहे. सूर्य आग ओकत असताना त्याचा परिणाम जसा जनजीवनावर होत आहे. तसाच तो जलसाठ्यांवरही होत आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघू प्रकल्पातील जलसाठ्यांत महिन्याभराच्या काळात मोठी घट झाली आहे. सध्या जिल्ह्यातील धरणात सुमारे 60 टक्के जलसाठा आहे.
गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. मागील तीन महिन्यांत गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. सरासरी इतक्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा निर्माण झाला. जलसाठ्यांची नोंद दररोज पाटबंधारे विभागाकडून घेतली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्पांत गेल्या महिन्याभरात चार ते पाच टक्के जलसाठा कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. प्रामुख्याने गेल्या महिन्याभरापासून तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, त्याचा फटका जलसाठ्यांना बसत आहे.
जलसाठ्यांत मुबलक पाणीसाठा असला तरी अजून किमान दीड ते दोन महिने उन्हाचा तडाखा जिल्ह्यात राहण्याची शक्यता असल्याने जलसाठे कमी होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. त्यात पिण्यासह सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भंडारदरा व मुळा या धरणामधून किमान प्रत्येकी दोन आवर्तन सोडली जाणार आहेत. त्यामुळे सध्या असलेल्या पाणीसाठ्यात आणखी घट होणार आहे. उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तापमानाचा पारा वाढला तर साहाजिक जलसाठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे.
आगामी काळातील पाण्याची मागणी, बाष्पीभवनाचा वेग बघता धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पाणीस्थिती चांगली असली, तरी पाणी नियोजनाची गरज जाणकारांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात भंडारदरा, मुळा व निळवंडे हे तीन मोठे प्रकल्प असून आढळा, मांडओहळ, पारगाव घाटशिळ, सीना, खैरी, विसापूर मध्यम प्रकल्प आहे. या मोठे व मध्यम प्रकल्पात 51 हजार 93 दशलक्ष घनफुट पाणीसाठा होतो. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा हा 45 हजार 122 दशलक्ष घनफुट इतका आहे.
गेल्या वर्षी आजच्या तारखेला 27 हजार 441 दशलक्ष घनफुट जलसाठा होता. तो यंदा 30 हजार 30 हजार 304 दशलक्ष घनफुट इतका आहे. त्यात नगर उत्तर जिल्ह्यात भंडारदरातून तर नगर दक्षिण जिल्ह्यास मुळा धरणातून पिण्यासह सिंचनासाठी पाणी उपलब्ध करू देण्यात येत आहे.
धरणांमधील सध्याचा जलसाठा
आकडेवाडी दशलक्ष घनफुटममध्येः भंडारदरा- 7 हजार 682 (69.59), मुळा – 15 हजार 878 (61.07), निळवंडे – 3 हजार 794 (45.60). आढळा- 758 (71.51), मांडओहळ- 101 (25.31), पारगाव घाटशिळ – 144 (32.95), सीना – 1 हजार 440 (59.99), खैरी – 262 (49.09), विसापूर – 245 (27.06)