पुणे – काल मध्यरात्री 2 वाजून 17 मिनिटांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात पुणे बंगलोर हायवे, नऱ्हे-आंबेगाव, स्वामी नारायण मंदिराच्या उतारावर एक मोठा मालवाहतुक करणारा ट्रक व खाजगी बस यांच्यात भीषण अपघात झाला. यानंतर अग्निशमन दलाकडून पुणे महानगरपालिकेची ०४ अग्निशमन वाहने व ०१ रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीएकडून ०१ रेस्क्यु व्हॅन अशी एकुण ०७ अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली.
घटनास्थळी पोहोचताच अपघातग्रस्त दोन्ही वाहने पलटी झाल्याचे अग्निशमन दलाच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य पाहून दलाचे अधिकारी व जवानांनी प्रथमत: बसच्या मागील बाजूची काच फोडून व काही जवान वरील बाजूस जाऊन रश्शीचा वापर करीत जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. तसेच पुढील बाजूस काही महिला व एक अंदाजे पंधरा वर्षाची मुलगी अडकली असता जवानांनी तिला मोठे प्रयत्न करीत जखमी अवस्थेत बाहेर काढले. अग्निशमन दलाकडून एकुण 17 जखमींना बाहेर काढले असून त्यांना शासनाच्या १०८ या रुग्णवाहिकेतून जवळपास असणाऱ्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.
ट्रकने ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार 17 जण जखमी असून चार जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.
खाजगी बस एमएच ०३ सीपी ४४०९ निता ट्रॅव्हल्स कंपनीची असून कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करीत होती. मालवाहतुक करणारा मोठा ट्रक एमएच १० सीआर १२२४ यामधे मोठ्या प्रमाणात साखरेची पोती असल्याचे समजले.
अग्निशमन दलाकडील नवले, सिहंगड, कात्रज, कोथरुड येथील फायरगाड्या व मुख्यालयातून एक रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए ०१ रेस्क्यु व्हॅन दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाकडून विविध अग्निशमन उपकरणे स्प्रेडर, कटर, लिफ्टिंग बॅग, पहार, कटावणी, फुट पंप वापरण्यात आली आहेत. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.