आपत्ती व्यवस्थापन विभाग आयएमडीच्या यंत्रणेवर अवलंबून

पिंपरी  – शहरात दररोज पडणारा पाऊस, गतवर्षीच्या तुलनेत यंदा झालेला पाऊस आदी माहिती मोजण्याची व्यवस्था महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) कार्यालयातून मिळणाऱ्या माहितीवरच त्यांना विसंबून राहावे लागते. विशेष म्हणजे आयएमडी देखील पुण्याच्या पावसाचे आकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला पुरवते आणि याच आकड्यांना शहराचे आकडे मानून काम चालवले जात आहे.

शहरात सध्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पवना, इंद्रायणी व मुळा नदी दुथडी भरून वाहत आहेत. दररोज किती पाऊस पडतो, आठवडाभरातील पावसाचा अंदाज, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पडलेला पाऊस याची माहिती महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे गरजेनुसार हवामान खात्याकडून घेतली जाते. पिंपरी-चिंचवड शहर हे झपाट्याने विस्तारत आहे. शहराची लोकसंख्या 22 लाखापेक्षा आधिक झाली आहे.

नागरीकरणाचा वाढता वेग लक्षात घेता विविध सुविधांची पूर्तता करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. शहरात पाऊस मोजण्याची यंत्रणा उभारणे देखील त्या दृष्टीने आवश्‍यक आहे. पाऊस मोजण्याची यंत्रणा उभारल्यानंतरच अतिवृष्टीमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. मात्र, सध्या अशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने महापालिकेला “आयएमडी’कडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावरच नियोजन ठरवावे लागत आहे.

पाच ठिकाणी बसविणार पर्जन्यमापक यंत्र
शहरात “आयएमडी’मार्फत पाच ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचे नियोजन आहे. महापालिका भवन, “ई’ व “ड’ क्षेत्रीय कार्यालय, जलशुद्धीकरण केंद्र (पेठ क्रमांक 23, प्राधिकरण), सांगवी करसंकलन कार्यालय आदी ठिकाणे निश्‍चित केली आहेत. संबंधित ठिकाणी शहरातील पाऊस मोजण्याची व्यवस्था केली जाणार आहे. शहरात पडणारा पाऊस मोजण्याची यंत्रणा सध्या महापालिकेकडे उपलब्ध नाही. परंतु सध्यातरी पुण्यातील एकूण पावसाच्या आकडेवारीच समाधान मानावे लागत आहे. “आयएमडी’कडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच शहरात पडलेला पाऊस, सरासरी पाऊस, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पडलेला पाऊस ही माहिती संकलित केली जाते, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

अत्यावश्‍यक बाबींना इतका उशीर का ?
शहराचा इतिहास पाहिल्यास 1982, 2005 आणि 2007 साली पिंपरी-चिंचवड शहराने देखील मोठे पूर पाहिले आहेत. सुदैवाने त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सावध राहणे आणि पुरासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण न करणे अत्यावश्‍यक आहे. यासाठी किमान महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला तरी शहरात किती पाऊस पडतो, सरासरी काय? दैनंदिन पावसाची नोंद या सर्व बाबी माहीत असणे अत्यावश्‍यक आहे. परंतु आपत्ती व्यवस्थापन विभाग “आम्ही आयएमडीकडून गरज असेल त्याप्रमाणे माहिती घेतो’, अशी मोघम उत्तरे देऊन मोघमच कारभार करत असल्याचे दिसून येत आहे. आता कुठे शहरात “आयएमडी’मार्फत पाच ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इतक्‍या अत्यावश्‍यक बाबीला इतकी वर्षे लागवीत हीच दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)