लग्नसराईतही मंगल कार्यालयांचा अवघा 5 ते 10 टक्केच व्यवसाय

पिंपरी – करोना प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शहरातील मंगल कार्यालयांसमोर अडचणींचा चक्रव्यूह तयार झाला आहे. लगीनसराई असतानाही गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये मंगल कार्यालयांचा केवळ 5 ते 10 टक्केच व्यवसाय झाला आहे.

 वीज बिल, मिळकतकर, कामगारांचा पगार, देखभाल खर्च यांचा बोझा मात्र अंगावर कायम आहे. त्यामुळे कार्यालय चालक मेटाकुटीला आले आहेत.

गतवर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन केल्यानंतर मंगल कार्यालयांना सुरूवातीला 100 जणांमध्ये लग्नसोहळ्यासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर केवळ 50 जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यान, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर डिसेंबर, जानेवारीमध्ये काही लग्नसोहळे झाले.

त्यानंतर, फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून पुन्हा करोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली. त्याचा परिणाम लग्नसोहळ्यांवर झाला. नागरिकांनी घरापुढे, मंदिरात हे लग्नसोहळे उरकुन घेतले. दरम्यान, राज्य सरकारने 22 एप्रिलपासून “ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले. त्यामध्ये केवळ 25 जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळ्यांना परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे एवढ्या कमी उपस्थितील लग्नसोहळे करायचे असल्याने नागरिकांचा मंगल कार्यालये, बॅक्वेंट हॉल यांच्याऐवजी घरगुती स्वरूपातच लग्नसोहळे उरकण्यावर भर राहिला. दरवर्षी नोव्हेंबरपासून लगीनसराईला सुरूवात होते. मे महिन्यापर्यंत मंगल कार्यालयांमध्ये लग्न सोहळे पार पडतात.

दरमहा 15 ते 20 लग्नसोहळे होतात. मात्र, यंदा करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे मंगल कार्यालयांमध्ये डिसेंबर, जानेवारी महिना वगळता लग्नसोहळ्यांचे प्रमाण खूपच अत्यल्प राहिले.

मंगल कार्यालये, बॅंक्वेट हॉलमध्ये होणाऱ्या लग्नसोहळ्यांना दरवर्षी चांगला प्रतिसाद असतो. मात्र, यंदा करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केलेले लॉकडाऊन, मंगल कार्यालयांसाठी 25 जणांच्या उपस्थितीत असलेली परवानगी, लागू केलेली नियमावली, नियमावलीचे उल्लंघन केल्यास होणारी दंडात्मक कारवाई यामुळे मंगल कार्यालये, बॅंक्वेट हॉल यांना मिळणारा प्रतिसाद खूपच घटला आहे. हा प्रतिसाद अवघा पाच ते दहा टक्‍क्‍यांवर येऊन ठेपला आहे.

इतर व्यावसायिकांवरही परिणाम
मोठ्या स्वरूपात दिमाखदार होणारे लग्नसोहळे सध्या होत नसल्याने त्याचा मोठा परिणाम केटरिंग व्यावसायिकांच्या व्यवसायावर देखील झाला आहे. त्यांची मागणी घटली आहे. तसेच, बॅंड पथक, फोटोग्राफर, मेकअप आर्टिस्ट यांनाही काम मिळविण्यात अडचणी येत आहेत. त्याशिवाय, मंगल कार्यालयांना भाजीपाला पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यवसायावर देखील त्याचा परिणाम झाला आहे.

केवळ 25 लोकांमध्ये लग्नसोहळा कसा करायचा, असा प्रश्‍न असल्याने बहुतांश नागरिक घरगुती स्वरुपातच लग्नसोहळे उरकण्यावर भर देत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातील लगीनसराईचा काळ यंदा वाया गेला आहे. केवळ 5 ते 10 टक्केच लग्नसोहळे मंगल कार्यालये आणि हॉलमध्ये झाले. वीजबिल, मिळकतकर, देखभाल खर्च, कामगारांचा पगार यावर होणारा खर्च मात्र वाचलेला नाही.
– सुमित बाबा, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड बॅक्वेट हॉल असोसिएशन.

डिसेंबर आणि जानेवारीमध्येच आमच्या मंगल कार्यालयात लग्नसोहळे झाले. त्यानंतर मात्र, लग्नसोहळ्यांना खुपच अत्यल्प प्रतिसाद राहिला. राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केल्यानंतर तर आम्ही मंगल कार्यालय बंदच ठेवले आहे. केवळ 25 जणांमध्ये लग्नसोहळा कसा करायचा, हा प्रश्‍न आहे.
– दीपक भोंडवे, मंगल कार्यालयाचे मालक. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.