पुणे – मुंढवा येथील एका वांधकाम व्यवसायीकाला बलात्काराच्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत 50 कोटीची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिष हरिष मिलानी (41,रा.सिल्वर वुडस, मुंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार सागर सुर्यवंशी, आरफ मर्चंट उर्फ अशरफ मेहबूब खान यांच्यासह एका महिलेवर खंडणी व धमकावण्याचा गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मनिष मिलानी यांचा गजानन डेव्हलपर्स नावाने जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. ते 20 नोव्हेंबर रोजी लष्कर परिसरात मित्रासह घरी जाण्यास निघाले होते. गाडीजवळ आले असताच अशरफने त्यांची गचंडी पकडून हम सागर भाई के आदमी हे(फिर्यादीचा पुर्वीचा कायदे सल्लागार) तेरे साथ बात करने को भेजा हे असे धमकावले. यानंतर तुला अखेरचे सांगतो सागर भाई विरुध्द जाऊ नकोस, त्यांच्याशी जे काही वाद आहेत, ते मिटवून टाक असे सांगितले. मिलानी यांनी काय मिटवायचे असे विचारले असता, त्यांना 50 कोटी रुपये देऊन टाक अशी मागणी केली.
यानंतर तुला तुझा जीव इतका स्वस्त: वाटतो का? असे म्हणत सोबतच्या महिलेकडे बोट दाखवत ही तुझ्यावर बलात्काराची केस दाखल करेल असे सांगितले. देण्यासाठी 50 कोटी नसतील तर लोहगाव येथील जागेत हिस्सा दे अशीही मागणी केली. यानंतर मिलानी यांना जोरात ढकलून देऊन शस्त्राच्या धाकाने जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
मिलानी यांच्यावर आरोपींनी वाई व भिवंडी येथे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर मिलानी यांनी सुध्द आरोपींवर पुर्वी खंडणीचा गुन्हा दाखल केला. मिलानी यांची लोहगाव येथे 59 एकर जमिन आहे. मात्र ती लष्कराच्या ताब्यात असून त्यासंदर्भात न्यायालयात वाद सुरु आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनमित राऊत करत आहेत.