कोलकाता : देशात कोरोनाच्या लसीकरणावरून राजकारण सुरू आहे. त्यातच काही राज्यांनी अगोदरच लस मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच आता पश्चिम बंगालच्या सरकारनेदेखील जनतेला कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज ही घोषणा केली. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
16 जानेवारी 2021 पासून संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे. आगामी कालावधीत पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी केलेली घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.
I am happy to announce that our government is making arrangements to facilitate the administration of #COVID19 vaccine to all the people of the state without any cost: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/I2Y9DvbHeo
— ANI (@ANI) January 10, 2021
पश्चिम बंगालमधील जनतेला कोरोनाची लस मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. आगामी आठवड्यातील गुरुवारपासून पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे.
14 जानेवारी 2020 पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. ही घोषणा करताना मला आनंद होत आहे की, पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य सरकार व्यवस्था करत आहे. कोरोना लसीसाठी पश्चिम बंगालच्या जनतेला कोणताही खर्च येणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे. आगामी एप्रिल-मे या कालावधीत सदस्य असलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे.