चंदीगड – पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. शनिवारी माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह 24 नेत्यांनी कपूरथला जिल्ह्यातील सुलतानपूर लोधी येथे भेट घेतली. राज्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ही बैठक झाल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या काँग्रेसला 117 पैकी केवळ 18 जागा मिळाल्या आहेत.
बैठकीला उपस्थित असलेले आमदार सुखपाल खेडा यांनी पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे नेते खेडा विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर, सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रमुखपदी नियुक्ती करावी, असं काही नेत्यांचं म्हणणं आहे.
बैठकीत निवडणुकीतील पराभव आणि भविष्यातील योजनांबाबत चर्चा झाली. तसेच खेडा यांना विरोधी पक्षनेते आणि सिद्धू यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंजाब काँग्रेसचे प्रमुख बनविण्याचे निश्चित करण्यात आलं. खेडा यांनी ट्विट करून म्हटलं की, “आम्हाला माहित आहे, पक्ष बदलाच्या जनादेशासह योग्यतेनुसार आणि प्रामाणिकपणे भविष्यातील निर्णय घेईल.”
खेरा म्हणाले की, सुलतानपूर लोधी येथील आमदार नवतेज सिंह चीमा यांच्या निवासस्थानी 24 समविचारी काँग्रेस नेत्यांनी बैठक घेतली. या बैठकीला आमदार, माजी आमदार, 2022 च्या निवडणुकीचे उमेदवार आणि पंजाब काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष उपस्थित होते. भेटीनंतर सिद्धू यांनी ट्विट केले की, आम्ही चांगल्या विचार घेऊन गांभीर्याने पंजाबच्या हक्कांसाठी लढू.