Senior Congress leader Rajani Satav passed away | हिंगोली – काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या व दिवंगत नेते राजीव सातव यांच्या मातोश्री माजी मंत्री रजनीताई सातव यांचे रविवारी रात्री निधन झाले. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. रविवारी त्यांना नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मागील काही दिवसांपासून आजार बळावत असल्याने त्यांच्यावर सतत उपचार सुरू होते. १८ फेब्रुवारी रोजी रविवारी त्यांना त्रास होत असल्याने नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्री ८ च्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. १९ फेब्रुवारी रोजी सोमवारी दुपारी कळमनुरीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रजनी सातव यांच्या निधनामुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
१९८० च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या नंतर दोन वर्षांनी त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले होते. आठ विभागांच्या उपमंत्री म्हणुन त्यांनी तीन वर्षे कार्य केले. त्यानंतर १९८५ च्या विधानसभेत त्या कळमनुरीमधुन दुसर्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडुन आल्या. या पुढच्या कार्यकाळात त्यांनी विविध विभागांचे राज्यमंत्री पद सांभाळले. या सोबतच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा, परिचारिका सेवा विषय समितीच्या अध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणुन त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले.
बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव निलंगेकर, शंकरराव चव्हाण व शरदचंद्र पवार अशा पाच मुख्यमंत्र्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. पुढे १९९३ मध्ये परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला. १९९९ पर्यंत त्यांनी विधान परिषदेच्या सदस्या म्हणुन काम पाहिले.
दिवंगत नेते कॉ. विठ्ठलराव नाईकांचा मजबुत गड असलेल्या कळमनुरी विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचा विस्तार करणे तसेच हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करण्यात रजनीताई यशस्वी राहिल्या. कळमनुरी परिसर शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असल्याने रजनीताईंनी प्रियदर्शनी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कै.शंकरराव सातव महाविद्यालयासहीत विविध विद्यालये सुरू केली.
दिवंगत नेते अॅड. राजीव सातव यांना समाज कारणासहीत राजकारणाचे धडे रजनीताईंनीच दिले होते. त्यांच्या शिकवणीमुळे दिवंगत राजीव सातव मसोड पंचायत समितीचे सदस्य ते खासदार असा राजकीय प्रवास करू शकले. या प्रवासात काँग्रेस पक्षात महत्वाचे स्थान मिळविलेल्या राजीव सातव यांच्यावर पक्षातर्फे अनेक मोठ्या जबाबदार्या टाकण्यात आल्या होत्या. त्यामध्ये गुजरात विधानसभेचे प्रभारी पद हे सर्वात महत्वाचे पद होते.
कोरोना काळात अॅड. राजीव सातव यांच्या झालेल्या दुर्दैवी निधनानंतर रजनीताई त्या दु:खातून सावरू शकल्या नाहीत. लहान मोठ्या आजारांनी सतत त्रस्त असतानाही त्यांनी सून विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांना समाजकारणात सक्रीय राहण्याची सतत प्रेरणा दिली. रजनीताई यांच्या निधनाने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.