पिंपरी – ऍमेझोन या शॉपिंग साइटवरून एका ग्राहकाने मोबाइल फोन मागवला. मात्र डिलिव्हरी बॉयने मोबाइल फोन ग्राहकाला न देता तो स्वतःकडेच ठेऊन ग्राहकाची फसवणूक केली. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. ही घटना 28 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत हिंजवडी येथे घडली.
मनोज राजू सूर्यवंशी (वय 19, रा. मुकाईनगर, हिंजवडी. मूळ रा. पाडळी, ता. जामखेड, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. याबाबत राशी श्रीवास्तव राजकुमार श्रीवास्तव (वय 27, रा. नारायणनगर, साखरेवस्ती, हिंजवडी) यांनी सोमवारी (दि. 26) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी श्रीवास्तव यांनी ऍमेझोन या शॉपिंग साइटवरून मोबाइल फोन मागवला होता.
मोबाइल 28 सप्टेंबर पर्यंत मिळणार असल्याचे ऑर्डरमध्ये सांगण्यात आले. मात्र, 30 सप्टेंबर पर्यंत मोबाइल न मिळाल्याने तसेच काही तांत्रिक अडचणी येत असल्याने श्रीवास्तव यांनी मोबाइल फोनच्या ट्रॅकिंग आयडी वरून पाहणी केली. त्यामध्ये हिंजवडी येथील ऍमेझोनचे डिलिव्हरी व्हेंडर शरयू मेडिकल येथे काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय मनोज याने मोबाइल चोरल्याचा प्रकार समोर आला.