नवी दिल्ली : निजामुद्दिन दर्गाह येथे एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यता कार्यक्रमात सहभागी झालेल्या अन्य व्यक्तींचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरवात केली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले असून पोलिस आणि आरोग्य विभागाने या भागातील 220 लोकांना तुघलक बाग आणि लोकनायक रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
हा कार्यक्रम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडला होता. या मशिदीत अनेक परदेशी नागरिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंदमान निकोबार, तेलंगणा आणि तमिळनाडू येथील लोकांनीही या कार्यक्रमात भाग घेतला असल्याचे दिल्लीच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची बाधा झाली असल्याचे सहा जण अंदमान मधून आले असल्याचे सांगण्यात आले.
या बाधितांच्या संपर्कात कोण आले आहेत, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे पोलिसांनी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
संपूर्ण दिल्लीत लॉकडाऊन सुरू आहे. निजामुद्दिन भागातील काही लोकांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने बाजारपेठ आणि गल्ली गल्लीत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आमचे अधिकारी निजामुद्दिन बस्ती भागात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले आहेत, असे पोलिस उपायुक्त आर. पी मीना यांनी सांगितले.