Arvind Kejriwal meets Uddhav Thackeray – आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते. मातोश्रीवर झालेल्या या भेटीनंतर उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल व भगवंत मान यांनी एका संयुक्त पात्रकारपरिषदेला संबोधित केले. यावेळी, अरविंद केजरीवाल यांनी शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याबाबत वक्तव्य केले. तसेच आगामी माहापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना व आम आदमी पक्ष एकत्र येणार का? या प्रश्नालाही उत्तर दिल.
काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
पत्रकारपरिषदेत अरविंद केजरीवाल यांना शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याबाबत विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना केजरीवाल यांनी, बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, आणि उद्धव ठाकरे हे त्याच वाघाचे पुत्र आहेत. उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष व त्यांचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण चोरण्यात आले आहे. मात्र येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरे हे निर्विवाद यश मिळवतील याची मला खात्री असल्याचं म्हंटलं.
मुंबई महापालिकेत आम आदमी पक्ष शिवसेना एकत्र लढणार?
यावेळी पतंत्रकारांनी केजरीवाल यांना आपण मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेसोबत लढणार का असा सवाल विचारला. यावर उत्तर देताना केजरीवाल यांनी, जेव्हा निवडणुका येतील तेव्हा याबाबत नक्की विचार करू. आम्ही देशाचा विचार करणारी लोकं आहोत, त्यामुळे आम्ही सध्या देशाच्या सद्यःपरिस्थितीबाबत चर्चा केली. जेव्हा निवडणुका येतील तेव्हा निवडणुकांबाबत विचार करू असं म्हंटलं.
कोव्हीड काळातील उद्धव ठाकरेंच्या कार्याचे कौतुक
दरम्यान, केजरीवाल यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना करोना संकट काळात केलेल्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. केजरीवाल यांनी, उद्धव ठाकरे मुंबई व महाराष्ट्रात कोव्हीड बाबत करत असलेल्या कार्याचा आम्हाला दिल्लीत उपयोग झाला. आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं हे सांगण्यात मला कोणताही कमीपणा वाटत नसल्याचेही ते म्हणाले.