जयपूर – दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाप्रसंगी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी आश्वासन दिले की, पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजे २०२४ पर्यंत देशातील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीने करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘आम्ही भारतातील महामार्ग अमेरिकेच्या बरोबरीने बनवण्याचा प्रयत्न करू.’, असे गडकरी म्हणाले.
गडकरी पुढे म्हणाले की, “पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आणि विशेषत: त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे जे ध्येय आमच्यासमोर ठेवले होते, त्या संदर्भात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भारतातील रस्ते पायाभूत सुविधांची उभारणी करू, असा आम्हाला विश्वास आहे. 2024 च्या अखेरीपर्यंत भारतातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू.
दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या या उद्घाटन सोहळ्याला संबोधित करताना रस्ते व वाहतूक मंत्री गडकरी म्हणाले, ‘हा महामार्ग मागासलेल्या भागातून जात असून, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यांचा विकास व्हावा, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते.
गडकरी म्हणाले की, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले सुमारे 500 ब्लॉक त्यांनी ओळखले आहेत, अशा प्रकारे हा महामार्ग त्या भागांसाठी विकासाचे इंजिन ठरणार आहे. जयपूर ते दिल्ली दरम्यान केबल टाकल्याने या महामार्गावर इलेक्ट्रिक ट्रक आणि इलेक्ट्रिक बसेसही धावू शकतील.