वॉशिंग्टन – रशिया आणि युक्रेन दरम्यानचे शत्रुत्व संपण्यासाठी भारताकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांचे अमेरिका स्वागतच करेल, असे वेहाईट हाऊसने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर या संदर्भात काही प्रयत्न करावे असे वाटत असल्यास त्याचेही स्वागत असेल, असेही व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे समन्वयक जॉन किर्बे यांनी शुक्रवारी ही अपेक्षा व्यक्त केली. काही दिवसांपूर्वीच अफगाण सुरक्षा परिषेदेच्या निमित्ताने भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसह रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी चर्चा केली होती.
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी अजूनही हे युद्ध थांबवू शकतात. त्यासाठी पंतप्रधान मोदीच त्यांना समजावून सांगू शकतात. यासाठी जे प्रयत्न मोदींना करावेसे वाटतील ते त्यांनी करावेत, असे आपल्याला वाटते आहे. झेलेन्सकी यांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या अपेक्षांनुसार, युक्रेनच्या नागरिकांना मान्य अशा कोणत्याही प्रस्तावांचे अमेरिकेला स्वागतच असेल, असेही किर्बे म्हणाले.
रशिया आणि युक्रेनने मुत्सद्यांच्या आणि चर्चेच्या माध्यमातून आपल्यातील मतभेद मिटवावेत आणि सध्या सुरू असलेला संघर्ष संपवावा, असे आवाहन भारताने वारंवार केले आहे. पंतप्रधान मोदींनी पुतीन आणि झेलेन्की दोघांशी अनेकवेळा फोनवरून चर्चा केली आणि त्वरित युद्धबंदी लागू करावी असे आवाहन देखील केले आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून भारत आणि रशियादरम्यानच्या संबंधांवर अजूनही काहीही परिणाम झालेला नाही. रशियाकडून भारतात आयात होणाऱ्या क्रूड तेलाच्या आयातीमध्ये गेल्या काही महिन्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये उझबेकिस्तानातील परिषदेत मोदींनी “आजचे युग युद्धाचे नाही.’ असे पुतीन यांना सुनावले होते.
“युक्रेनच्या नागरिकांना सध्या जे सोसावे लागते आहे, त्याला पुतीन हे एकमेव व्यक्ती कारणीभूत आहेत. युक्रेनच्या वीज आणि उर्जा प्रकल्पांवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्याने युक्रेनच्या नागरिकांना पूर्वीपेक्षाही अधिक त्रास सहन करावा लागेल. यापेक्षा आता पुतीन यांनीच हे युद्ध थांबवायला पाहिजे. तेच हे करू शकतात. तरच झेलेन्सकी वाटागाटीला तयार होतील. यासाठी जे प्रयत्न पंतप्रधान मोदींना जे प्रयत्न करावेसे वाटतील, त्याचे स्वागतच असेल.” -जॉन किर्बे, (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेचे समन्वयक, अमेरिका)