Delhi Hazardous Air Quality : अंदाजे दिवाळी झाली की दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट पातळीवर पोहचते मात्र यंदा ही गुणवत्ता दिवाळी आधीच वाईट पातळीवर पोहचली आहे.
दिल्ली सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी कृती योजना सुरू केल्याचा दावा केला जात आहे. दिल्ली सरकारने सांगितले की, त्यांनी आपल्या अधिकार्यांना टप्प्याटप्प्याने उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे ज्याद्वारे रस्त्याच्या कडेला भोजनालये, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये कोळशाच्या वापरावर बंदी घालण्यात येईल.
GRAP शी संबंधित केंद्र सरकारच्या उपसमितीच्या बैठकीत असे सांगण्यात आले की, गेल्या 24 तासांत या भागातील हवेच्या गुणवत्तेच्या मापदंडांमध्ये अचानक घट झाली, ज्यामुळे दिल्लीचा वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) 212 वर पोहोचला म्हणजे खराब श्रेणीत पोहचला आहे, हवेच्या गुणवत्तेत आणखी बिघाड रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, संपूर्ण NCR मध्ये GRAP चा पहिला टप्पा त्वरित लागू करण्याची गरज आहे, असे वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे.
दिल्ली सरकार काय म्हणतंय ?
हिवाळा जसजसा जवळ येत आहे, तसतसे दिल्लीतील वाढते प्रदूषण पाहता, दिल्ली सरकार हिवाळी कृती योजनेअंतर्गत धूळविरोधी मोहीम सुरू करत आहे. दिल्ली सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानुसार, ही मोहीम ७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय धूळ विरोधी मोहिमेच्या पहिल्या दिवशी शनिवारी (7 ऑक्टोबर 2023) दुपारी 12 वाजता वजीरपूर परिसरातील हॉट स्पॉट्सची अचानक पाहणी करतील.
दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक या श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत
सरकारने दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेची चार श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 201-300 म्हणजेच ‘खराब’ असताना पहिली श्रेणी लागू केली जाते. जेव्हा AQI 301-400 (अत्यंत खराब) असेल तेव्हा दुसरी श्रेणी लागू केली जाते, जेव्हा AQI 401-450 (गंभीर) असेल तेव्हा तिसरा टप्पा लागू केला जातो आणि जेव्हा AQI 450 पेक्षा जास्त (तीव्र पेक्षा जास्त) असेल तेव्हा चौथा टप्पा लागू केला जातो.