अकोला : भाजपचे नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. अकोल्याहून अमरावतीकडे जात असताना कुरणखेड जवळ बसची विजयराज शिंदे यांच्या फॉर्च्युनर गाडीला धडक बसली. या अपघातात विजयराज शिंदे जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकोल्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेते अनिल बोंडे यांची भेट घेऊन ते अमरावतीकडे निघाले होते. त्याचवेळी कुरणखेडजवळ त्यांच्या गाडीला समोरुन येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. अपघातानंतर विजयराज शिंदे यांच्यावर अकोला शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाआरोग्य शिबिरासाठी अकोल्यात दाखल झाले आहेत. नांदेड रुग्णालयातील मृत्यूनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नेमका कसा घडला अपघात?
बुलढाण्यावरून अमरावतीच्या दिशेने जाणारी गाडी क्रमांक एम एच २८ ए एन २७५७ ही गाडी समोरून येणारी बस क्रमांक एम एच ४० एन ९७१८ ही कारंजा वरून अकोल्याच्या दिशेने जात होती. दोन्ही गाड्यांमध्ये समोरासमोर धडक झाली असून यामध्ये चारचाकी वाहनामधील बुलढाण्याचे भाजपा माजी आमदार विजयराव शिंदे जखमी झाले. त्यांच्यासह त्यांचे चार सहकारी, बसमधील दोन शाळकरी विद्यार्थी, दोन वयोवृद्ध महिला जखमी झाले आहेत.