दुबई – सलामीवीर पृथ्वी शॉ व कर्णधार ऋषभ पंत यांच्यासह शेमरन हेटमायर यांनी केलेल्या जिगरबाज फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी 173 धावा करण्याचे आव्हान ठेवले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या येथे सुरु असलेल्या दुसऱ्या पर्वातील या क्वालिफायर 1 लढतीत विजय मिळवून थेट अंतिम फेरी गाठण्याची दोन्ही संघांना समान संधी आहे.
या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. दिल्लीची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन केवळ 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर व अक्सर पटेल यांनीही निराशा केली.
दुसऱ्या बाजूने पृथ्वी शॉ याने मात्र, चेन्नईच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. यंदाच्या स्पर्धेत त्याची बॅट प्रथमच तळपली. त्याने केवळ 27 चेंडूत अर्धशतक फटकावले. त्यानंतरही तो त्याच ढंगात खेळत असतानाच बाद झाला. त्याने आपल्या 60 धावांच्या खेळीत 34 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 3 षटकार अशी आतषबाजी केली. त्यानंतरही दिल्लीची अवस्था 4 बाद 80 अशी बिकट बनली होती. त्याचवेळी कर्णधार पंत व हेटमायर ही जोडी एकत्र आली व त्यांनी घणाघाती फलंदाजी करत डाव तर सावरलाच पण संघाला आश्वासक धावसंख्या उभारून दिली.
या जोडीने पाचव्या गड्यासाठी 83 धावांची बहुमोल भागीदारी केली व संघाचे दीडशतक फलकावर लावले. अखेरच्या षटकांमध्ये धावांचा वेग आणखी वाढवण्याच्या प्रयत्नात हेटमायर 37 धावांच्या खेळीत 24 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 1 षटकार फटकावून बाद झाला. त्यानंतर अखेरच्या षटकात पंतने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. त्याने 35 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी केली. चेन्नईकडून जोश हेझलवूडने 2 गडी बाद केले. रवींद्र जडेजा, मोईन अली व ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक –
दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 5 बाद 172 धावा. (पृथ्वी शॉ 60, शेमरन हेटमायर 37, ऋषभ पंत नाबाद 51, जोश हेझलवूड 2-29, रवींद्र जडेजा 1-23, मोईन अली 1-27, ड्वेन ब्राव्हो 1-31).