पुणे – ससून हॉस्पिटल जवळील बस थांब्यावर एका तरुणाने पोलिसाचे पाकिट मारुन पळ काढला. यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर संबंधीत तरुण एका वडा पावच्या गाडीवर वडापाव खाताना पोलिसांना सापडला. त्याला अटक करुन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अनिल अरुण बोबडे (26 रा. बच्चू अड्डा चौक, कॅम्प, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी सुरज शिवाजी सुळे (28 ) हे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. ते एका खासगी कामानिमीत्त दि. 7 ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयात आले होते. काम झाल्यानंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील बस थांब्याजवळ बसची वाट पहात थांबले होते.
यावेळी बोबडेने त्यांच्या खिशामध्ये हात घालून त्यांचे पाकीट व रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो धक्का देऊन पळून गेला. यानंतर सुळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
चोरट्याचा शोध घेत असताना सहायक पोलीस निरीक्षक कोळी, उपनिरीक्षक राहुल पवार तपास पथकातील स्टाफ सह पुणे स्टेशन परिसरात शोध घेत होते. तेव्हा बोबडे हा तुकाराम शेठ शिंदे वाहनतळा समोर वडापावच्या हातगाडीवर वडापाव खात असताना दिसून आला. त्यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्हयात त्याला अटक करुन त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.