मुंबई – विधानसभेच्या आमदारांच्या अपात्रता सुनावणीचा निकाल लागल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या विधान परिषद आमदारांची अपात्रता सुनावणी आज अर्थात शुक्रवारी पार पडली. या प्रकरणाच्या सुनावणीचे वेळापत्रक सहा आठवड्यांनंतर घोषित केले जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. (Delay in Legislative Council MLA disqualification case; The hearing schedule will be announced after 6 weeks)
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासमोर विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये ही सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत दोन्ही गटांनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांच्या संदर्भात पडताळणीसाठी कागदपत्रांची देवाणघेवाण केली. राष्ट्रवादीचे विधान परिषदेत ९ आमदार असून त्यापैकी ३ आमदार शरद पवार, तर ६ आमदार अजित पवार गटाकडे आहेत.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत.
जयंत पाटील यांनी आमदार सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी यांच्याविरोधात, जितेंद्र आव्हाड यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. त्याचप्रमाणे अमोल मिटकरी यांनी एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरुण लाड यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. आता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे काय निर्णय देणार, हे पाहावे लागेल.