हैदराबाद – दिल्ली दारू धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना ताब्यात घेतले आहे. आता त्यांना चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात आले आहे. ईडीने आज के. कविता यांच्या हैदराबाद येथील घरावर छापा टाकला होता, त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. (ED arrests BRS MLC K Kavitha after raids in connection with Delhi liquor policy case)
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. के. कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या सदस्या आहेत. त्या पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. या प्रकरणी त्यांची यापूर्वीही चौकशी करण्यात आली होती. मात्र, यावर्षी दोनदा चौकशीसाठी बोलवूनही त्या हजर राहिल्या नाहीत. यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी के. कविता यांच्या निवासस्थानी छापा टाकला.
दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अमित अरोरा याने चौकशीदरम्यान कविता यांचे नाव घेतले होते. एजन्सीने आरोप केला आहे की ‘साउथ ग्रुप’ नावाची एक मद्य लॉबी होती, ज्याने आणखी एक आरोपी विजय नायरच्या माध्यमातून आप नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिली होती.
ईडीच्या म्हणण्यानुसार, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपच्या नेत्यांसह, दक्षिण ग्रुपचे सरथ रेड्डी, एम श्रीनिवासुलू रेड्डी, राघव मागुंटा आणि के कविता, अरुण पिल्लई, अभिषेक बोईनपल्ली आणि बुची बाबू यांचा या प्रकरणात सहभाग आहे.