देहूगाव, (वार्ताहर) – देहू नगरपंचायतीच्या वतीने हद्दीतील मिळकत कर थकबाकीदारांच्या मालमत्तांना प्रथमच टाळे लावून सील करीत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. विठ्ठलवाडी बाह्यवळण परिसरातील मिळकत कर थकबाकीदारांच्या चालू स्थीतीत असलेल्या चार वर्कशॉप कंपन्यांना बुधवारी टाळे लावून सील करण्यात आले आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.
देहू नगरपंचायतीच्या हद्दीत मिळकत कर थकबाकीदारांना कर भरण्यासाठी प्रथम दवंडी, नोटीस, प्रत्यक्ष भेटून, मोबाइलद्वारेही संपर्क साधून तर थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजवून आणि वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. अनेकांनी दिलेले धनादेश ही बँकेतून परतले होते. त्यांना मुदतही देण्यात आली होती.
त्यानंतरही थकबाकीदारांनी थकबाकी न भरल्याने सुमारे २५० थकबाकीदारांना मालमत्ता सील करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. असे असतानाही निर्डावलेले थकबाकीदारांनी थकबाकी न भरल्याने बुधवारी (दि. २०) नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारत मिळकती सील करण्यात आल्या.
विठ्ठलवाडी येथील शिवलिंग वसंत जरे या एकाच मालक्याचे ३ कंपन्या असून त्यांचे सुमारे १३ लाख,६५, रुपये तर सुभाष धोंडीबा काळोखे यांच्या जागेवर वसंत भसे यांची कंपनी असून त्यांच्याकडे ७ लाख,९० हजार,२४६ रुपये थकबाकी होती. या चारही कंपन्या जागा मालकांनी भाड्याने दिल्या असून कंपनीकडून ते नियमित भाडे वसुलही करत आहे.
मात्र नगरपंचायतीचा कर भरण्यास ते टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले. या कंपन्यांना कर भरण्यासंदर्भात सूचना देण्यासाठी अनेक वेळा प्रत्यक्ष भेटी दिल्या असून वारंवार नोटीस देखील बजावल्या असताना ही कर न भरल्याने या चार कंपन्याना टाळे लावून सील करण्यात आले आहे.
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनात कार्यालयीन अधीक्षक रामराव खरात, कर संकलन अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी धनंजय नायकवडे, कर विभागाचे कर्मचारी आशा मोरे, अजय वाल्मिकी, आसिफ शेख,
सुरेश खंडागळे, दत्ता शिंदे, महेश पाटोळे, ज्ञानेश्वर निकम, प्रतीक चव्हाण, राजु शेळके, दिपक काळोखे, पवन मोरे यांच्या पथकाने पोलीसांच्या मदतीने मिळकतकर जप्तीची ही कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली.