बेलसर – पुणे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभाग व महिला, बालकल्याण विभागामार्फत पुरंदर तालुक्यात अंगणवाडीतील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची चाइल्ड हेल्थ ट्रॅकिंग सिस्टीममधून आरोग्य तपासणी केली. यावेळी तालुक्यातील एकूण 13 हजार 362 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीमधून कमी वजन, उपजात व्यंग किंवा आजारी असलेले बालकांची संख्या 273 आढळून आली.
तपासणीअंती आढळून आलेल्या 273 बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे बालरोगतज्ज्ञांमार्फत शिबिराचे आयोजन करून त्यांची तपासणी केली. शिबिरांमधून 208 बालकांची तपासणी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या टीमकडून केली. ज्या बालकांना पुढील संदर्भ सेवेची गरज आहे. अशा बालकांना औंध हॉस्पिटल येथे पुढील उपचार देण्यात येणार आहेत. शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरासाठी पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते, आदर्श सरपंच हरिभाऊ लोळे, बेलसरचे सरपंच अर्जुन धेंडे, उपसरपंच धीरज जगताप, चंद्रकांत हिंगणे, हनुमंत जगताप, पोपट जगताप उपस्थित होते. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. ताकवले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम काळे, डॉ. गेंजगे, डॉ. सागर डांगे, डॉ. पवार, डॉ. पाटील डॉ. आबनावे उपस्थित होते. शिबिरासाठी गटविकास अधिकारी अमर माने व तालुका आरोग्य अधिकारी विक्रम काळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांचे मार्गदर्शन लाभले.