सहारनपूर – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी राज्यात 80-20 च्या प्रचाराचे सूत्र राबवले आहे. तथापि राज्यातील 80 टक्के जनता समाजवादी पक्षाबरोबर आहे, असा दावा समाजवादी पक्षाचे नेते इम्रान मसुद यांनी केला आहे. ते म्हणाले की, भाजपबरोबर जेमतेम 20 टक्के लोक जातील याची मुख्यमंत्र्यांना कल्पना नसल्यानेच ते 80-20 वर भर देत आहेत.
येथील एका सभेत बोलताना त्यांनी समाजवादी पक्षाचे तुरुंगात असलेले नेते आझमखान यांचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले की, अत्यंत खोट्या आणि हास्यास्पद आरोपखाली योगींनी त्यांना कारागृहात डांबले आहे. त्यांची त्वरित सुटका करण्याची मागणीही त्यांनी केली.
आझमखान हे कारागृहाच्या बाहेर आले तर अखिलेश यांच्या पदालाच धोका निर्माण होईल म्हणून अखिलेश यांनाच आझमखान हे कारागृहातच राहिलेले हवे आहेत, असे विधान मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केले होते.
त्या विधानाचाही मसुद यांनी यावेळी जोरदार समाचार घेतला. जर मुख्यमंत्री म्हणतात असे असेल तर त्यांनी खरेच आझमखान यांना कारागृहाबाहेर आणून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. आझमखान यांच्यावर दरोड्याचाही दावा योगींच्या सरकारने केला आहे. अशा क्षुल्लक आरोपातून योगींनी राजकारणाचा विनोदच केला आहे, असे ते म्हणाले.