पॅरिस – फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत शुक्रवारी एका धक्कादायक निकालाची नोंद झाली. बेलारुसची अव्वल मानांकित टेनिसपटू आर्यना सबालेन्काला नवोदित खेळाडूकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.
रशियाच्या अनास्ताशिया पावीयुशेन्कोव्हा या गुणवान खेळाडूने सबालेन्कावर तीन सेटमध्ये 6-4, 2-6, 6-0 अशी सहज मात केली. अनास्ताशियाने पहिला सेट जिंकल्यावर सबालेन्का दडपणाखाली आली. मात्र, तिने आपल्या अनुभवाच्या जोरावर दुसरा सेट जिंकत सामन्यात बरोबरी केली. त्यानंतर मात्र अनास्ताशियाने तिसरा सेट सुरू झाल्यावर सबालेन्काला एकही संधी दिली नाही व हा सेट सहज जिंकत चौथ्या फेरीत प्रवेश केला.
अग्रमानांकित ऍश्ले बार्टी हिने दुखापतीमुळे दुसऱ्या फेरीच्या सामन्यातून माघार घेतली. महिलांमध्ये नवव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला पराभवाचा धक्का बसला. एलिना स्वितोलिना आणि डॅनिल मेदवेदेव यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.
2019 सली विजेतेपद पटकावणारी बार्टी पोलंडच्या मॅगदा लिनेटविरुद्धच्या सामन्यात 1-6, 2-2 अशा पिछाडीवर होती. मात्र, त्याचवेळी डाव्या पायाला दुखापतीमुळे खेळणार नसल्याचे तिने चेअर पंचांना सांगितले. बार्टीने अमेरिकेच्या बेर्नांडा पेराविरुद्धच्या पहिल्या फेरीत 6-4, 3-6, 6-2 असा विजय मिळवला होता. पण या सामन्यातही तिला दुखापतीचा त्रास जाणवत होता. अन्य लढतींत महिलांमध्ये प्लिस्कोव्हा हिला अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्सकडून 7-5, 6-1 असा पराभव पत्करावा लागला.
पाचव्या मानांकित एलिना स्वितोलिना हिने ऍनि ली हिच्यावर 6-0, 6-4 असा सहज विजय मिळवत तिसऱ्या फेरीत मजल मारली. 23 ग्रॅण्डस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्स हिने मिहाएला बुझार्नेस्कू हिच्यावर 6-3, 5-7, 6-1 असा विजय मिळवला. मेदवेदेव याने अमेरिकेच्या टॉमी पॉल याला 3-6, 6-1, 6-4, 6-3 असे पराभूत केले.
बोपण्णा-स्कुगोरची आगेकूच
भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा क्रोएशियाचा सहकारी फ्रॅंको स्कुगोर यांनी पुरुष दुहेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. बोपण्णा-स्कुगोर यांनी अमेरिकेच्या फ्रान्सेस टियाफो आणि निकोलस मोन्रो यांच्यावर 6-4, 7-5 असा विजय मिळवला. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याकरिता या स्पर्धेत सरस कामगिरी करत क्रमवारीत सुधारणा करण्याची बोपण्णाकडे ही अखेरची संधी असेल.