नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाला आज अत्यंत संवेदनशील याचिकेवर सुनावणी पार पडली. मुस्लीम महिलांनी मशिदीत नमाज पठण करण्यासंबंधीच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’च्या ( एआयएमपीएलबी ) वतीने महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास परवानगी असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.
पुण्यातील वकील फरहा अन्वर हुसैन शेख यांनी सर्वोच्च न्यायालयात या संबंधी एक याचिका दाखल केली होती. त्यात भारतातील मशिदींमध्ये मुस्लीम महिलांना प्रवेश तसेच नमाज पठण करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तसेच असे करणे अत्यंत बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला होता. त्यावर ‘एआयएमपीएलबी’ने आज सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
‘एआयएमपीएलबी’ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, “मुस्लीम महिलांना मशिदीत प्रवेश करण्यास अथवा नमाज पठण करण्यास कोणतीही मनाई नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.
तसेच, महिलांनी दिवसातून पाचवेळा नमाज सामूहिकरित्या पठण करण्याची गरज नाही. पण, महिलांनी घरी किंवा मशिदीत नमाज पठण केले तरी, इस्लामनुसार त्यांना पुण्य मिळणार आहे,” अशी माहिती मुस्लीम लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.