अहमदाबाद – निवडणुकीत मुस्लिम महिलांना तिकीट देणाऱ्या राजकीय पक्षांवर जामा मशिदीचे शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी टीका केली आहे. ( Controversial statement of Shahi Imam) आमच्या धर्मात पुरूषांचा तुटवडा पडला आहे का, असा सवालही त्यांनी अहमदाबाद येथे माध्यमांशी बोलताना केला.
महिलांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांवर टीका करताना ते म्हणाले की, या प्रकारामुळे आमचा धर्म दुबळा होतो आहे. इस्लाममध्ये सगळ्यांत जास्त महत्व नमाजाला आहे. जर महिलांनी लोकांसमोर येणे इस्लामनुसार योग्य असते तर महिलांना मशिदीत येण्यापासून रोखले गेले नसते.
महिलांना तसे रोखण्यात आले कारण इस्लाममध्ये महिलांना एक स्थान आहे. त्यांना जर कोणी निवडणुकीचे तिकिट देत असेल तर ते धर्माच्या विरोधात बंड केल्यासारखे आहे. एखाद्या जागेवरून महिलाच निवडणूक लढू शकतील असा कायदा असेल तर ते समजू शकतो. मात्र तसे काही नसताना महिलांना का तिकीट दिले जाते आहे, असा सवाल त्यांनी केला.