बंगळुरू – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्या विरोधात भाजपने मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यावरून कर्नाटकमधील विशेष न्यायालयाने कॉंग्रेसच्या तिन्ही नेत्यांना समन्स बजावले. त्यांना २८ मार्चला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
कर्नाटकमध्ये मागील वर्षी विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणूक काळात कॉंग्रेसने त्यावेळी सत्तेवर असणाऱ्या भाजपला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरले. त्याविषयीच्या जाहिराती कॉंग्रेसने वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धीसाठी दिल्या.
त्यामध्ये तत्कालीन सरकारच्या भ्रष्टाचाराचे रेट कार्ड प्रसिद्ध करण्यात आले. भाजपने निवडणूक झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांविरोधात खटला दाखल केला. कॉंग्रेसने खोट्या जाहिराती प्रसिद्धीस देऊन आमची प्रतिमा मलिन केली, असा आरोप भाजपने केला.