नवी दिल्ली : देशात सध्या विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या निवडणुका पार पडणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष आपापला प्रचार कार्यक्रम किंवा योजनांच्या घोषणेतून करताना दिसत आहेत. त्यातच दिल्लीत होणाऱ्या महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. मात्र हे करत असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अडाणीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण पक्षाच्या कार्यक्रमात पोस्टरवर त्यांनी झोपडपट्टी रहिवासी म्हणून चक्क एका प्रसिद्ध तमिळ लेखकाचा फोटो छापला असल्याचे समोर आले आहे.
भाजपाच्या दिल्लीतील अशाच एका कार्यक्रमातील पोस्टरवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. कारण या पोस्टरमध्ये झोपडपट्टीमधील रहिवासी म्हणून चक्क तमिळ साहित्यिक मुरुगन यांचा फोटो लावण्यात आला आहे. या मुद्द्यावरून वाद निर्माण होताच त्यावर भाजपाकडून हे प्रकरण सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला.
राजधानी दिल्लीमध्ये भाजपाकडून झुग्गी सम्मान यात्रा अर्थात झोपडपट्टी सन्मान यात्रा नावाचा एक उपक्रम राबवला जात आहे. दिल्लीतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर छापण्यात आलेल्या पोस्टर्सची सध्या चर्चा सुरू झाली आहे. कारण या पोस्टर्सवर तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांचा फोटो झोपडपट्टी रहिवासी म्हणून छापण्यात आला आहे.
यासंदर्भात विचारणा केली असता पेरुमल मुरुगन यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली आहे. “मी स्वत: झोपडपट्टीमध्ये राहिलो आहे. त्यामुळे माझा फोटो त्यांच्यासोबत झळकल्यामुळे मला आनंदच झाला आहे”, असे मुरुगन यांनी एक इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना म्हटले आहे.
पेरुमल मुरुगन हे नावाजलेले तामिळ साहित्यिक आहेत. त्यांनी आजपर्यंत १० कादंबऱ्या आणि अनेक लघुकथा, तसेच कविता लिहिल्या आहेत. मात्र, त्यांचा फोटो पोस्टर्ससाठी वापरल्यामुळे यावरून आता वाद निर्माण झाला आहे.