पुणे – पुण्यातील पंचतारांकित हॉटेलात होणाऱ्या बड्या हस्तींच्याच लग्न सोहळ्यात कॉपीराईटचा परवाना न घेतल्याने कारवाईची भीती दाखवत खंडणी वसुल केल्याप्रकरणात दोघांना जामीन झाला आहे. सत्र न्यायाधीश एस.बी. हेडाऊ यांनी तपासास सहकार्य करणे आणि प्रत्येक शनिवारी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर हा निकाल दिला.
अभिषेक प्रतापराव देशमुख आणि अमित कैलास देशपांडे अशी जामीन झालेल्या दोघांची नावे आहेत. बचाव पक्षातर्फे ऍड. सतीश मानेशिंदे, ऍड. सुधीर शहा, ऍड. सुनिता बन्सल, ऍड. नितीश चोरबेले, ऍड. प्रेरणा कोठारी आणि ऍड. लिलियन दास यांनी बाजू मांडली. याबाबात निखील प्रमोद करमचंदाणी (वय 30, रा. मोतीबाग) यांनी फिर्याद दिली आहे. असा गुन्हा उघड झाल्याने शहरात खळबळ माजली होती.
खुद्द पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या गुन्ह्याची नोंद घेतली होती. पोलिसांनी भादवी कलम 420, 384, 385 सह विविध कलामान्वये गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार ऑगस्ट 2021 व त्यापुर्वी घडला आहे. फिर्यादी यांच्या बहिणीचे कोरेगांव पार्क येथील कॉनरॉड या पंचतारांकित हॉटेलात लग्न सोहळा होता. ऑगस्ट महिन्यात हा विवाह पार पडला होता. मात्र, त्यादरम्यान, लग्न सोहळा असलेले कुटूंब व हॉटेल मालक यांना लग्नात कॉपीराईट प्रमाणे लायसन्स घेण्यास सांगितले. लायसन्स न घेतल्यास लग्न सोहळा बंद पाडण्याची भीती घातली. तसेच, धमकी देऊन खंडणी स्वरूपात एकूण 89 हजार 600 रुपये घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.